Tuesday, October 23, 2012

अलिखित करार

तुझ्या-माझ्यात
आहेत काही अलिखित करार
काही अबोल नियम
तू ही पाळतोस कसोशीने
आणि मी ही असोशीने...

शब्दांशिवायच संमत झालेले काही ठराव
आणि मूक डोळ्यांनी स्वाक्षरी केलेले करार - मदार
उमगतात तुलाही – मलाही...

जगणं सोपं (की अवघड?) करून गेलेले क्षण
निभावतात मग मुक्या साक्षीदारांची भुमिका
त्या अलिखित करारपत्रांवरली
ही एकच गोष्ट फक्त लिखित स्वरुपातली!

--शुभा मोडक
(२३-ऑक्टोबर-१२)

Sunday, June 17, 2012

रेशीमगाठ

तुझा माझा रेशमी बंध..
ती गाठ रेशमीच राहू दे
.
सुती गाठ किती घट्ट बसते माहितीये ना?
सोडवू म्हणता सोडवता येत नाही...
उलट सोडवण्याच्या नादात अजूनच घट्ट होत जाते!
जितकी जास्त आवळली जाते तितके जास्त वळ!
आणि मग ओढाताणीत तुटतेच ती
किंवा दोर कापून टाकावे लागतात...
तरीही उमटलेले वळ स्वतःची खूण सोडतातच मागे..
कधी हुळहुळती... कधी भळभळती!
.
रेशीमगाठीचं तसं नाही!
जितकी अलगद बसते तितकीच अलगद सुटतेही!
आणि सुटतानाही कुठल्याही वळाचा लवलेशही नाही 
उलट मऊसुत झुळझुळत्या स्पर्शाची अनुभूती..
.
.
एक मात्र आहे!
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं अस्तित्त्व मात्र नाकारता येत नाही!
मनातला एक हळवा कोपरा पकडून त्या बसतातच ठाण मांडून!
.
.
पण तरी,
आपल्या मनातलं कुणाला बघता येत नाही हे किती चांगलंय ना!
म्हणूनच म्हणते!
ही रेशीमगाठ रेशमीच राहू दे!

शुभा मोडक (०६-जून-१२)

Thursday, May 17, 2012

फुंकर

फुंकर घालायचीच असेल तर
थेट जखमेवरच घातली पाहिजे असं नाही...
जखम शरीरावर असली तरी वेदना मनातही असते
तिथेच घालायची फुंकर.... अलवारपणे...
.
.
शरीरावरचा घाव कधी ना कधी होईलच बरा!
फार फार तर सोडेल एखादा फिकुटलासा व्रण...
पण मनातला सल वेळीच नाही उपटला
तर...
रुतत जातो आत!
त्यालाच आधी करून टाकायचा नाहीसा!
.
..
आणि हो!
त्यासाठी प्रत्येक जखमेचं मूळ माहीत असायलाच हवं
याची काही आवश्यकता नाही!
.
..
हे शिकलेय.... तुझ्याकडूनच!


--शुभा मोडक (२३-एप्रिल-१२)

Thursday, May 10, 2012

संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

संदर्भ - संयम आणि मोह


 
सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामध्ये
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

Tuesday, May 8, 2012

अभी भी..........

फडफडाते है अभी भी यादोंके कुछ पन्ने
जिनपे अपने निशान छोडे थे तुमने कभी....

महकती है अभी भी कभी कबार सांसे
तुम्हारी सांसो ने जिनको छुआ था कभी....

थरथराता है अभी भी शर्म से मेरा बदन
तुम्हारी बाहोंने जिसे समेटा था कभी....

भर आती है अभी भी आँखे युं ही बिना बात के
तुम्हारे सपने जिनमे सजाये थे कभी....

दोहराते है अभी भी मेरे होठ उन्ही नगमोंको
तुम्हारे होठोंने जिनको छेडा था कभी....

हां, धडक लेता है अभी भी ये दिल
तुम्हारे प्यार ने जिसे जि़ंदा किया था कभी....


--शुभा मोडक (०८-मे-२०१२)

Wednesday, May 2, 2012

संयम आणि मोह

एकच कविता २ वेगवेगळ्या प्रकारे सूचली होती. दोन्हीतला मूळ आशय सारखाच असला तरी शेवटाकडे एक सूक्ष्मसा फरक आहे. म्हणून शीर्षकेही वेगवेगळी दिली आहेत.

संयम की मोह?

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे, त्याचं काय करू?
आता बघायचं कोण जिंकतं?
संयम...... की मोह?


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संयम आणि मोह

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
आणि मग घेतली संयमाची झूल पांघरून
पण काही चुकार आठवणी बधतच नाहीत
येतातच इवल्याश्या फटीतूनही
सरकत बाहेर...
मोह होतोच मग त्यांना कवटाळण्याचा
घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)
मग मात्र देते जबरदस्तीने परत धाडून
फटीतूनच सावकाश...
पण तुझ्याच आठवणी त्या!
तुझ्याइतक्याच बदमाष!
फटीआडूनही मिश्किल डोळ्यांनी डोकावतच राहतात
मग मात्र पुन्हा घेते संयमाने पाठ फिरवून!
आता....
असाच चालू रहायचा हा खेळ निरंतर..
कधी संयमाची सरशी
तर कधी मोहाची जीत!
..
.
.
चालायचंच!

--शुभा मोडक (२६-एप्रिल-१२)

Sunday, April 29, 2012

तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्या प्रेमाचं आभाळ
दिलं तुला मी आंदण
बदल्यात चंद्रस्पर्श
अंगांगावरी गोंदण

तुझे अवचित येणे
असे माझ्या आयुष्यात
जशी काळोख्या रात्रीला
लाभे चांदणपहाट

उधाणल्या ह्या मनाला
मग भरतीची लाट
तुझ्या ओलेत्या खुणांनी
गच्च माझी पायवाट

मनाच्या ओल्या रेतीत
सयींचे शंख-शिंपले
रंगीबेरंगी क्षणांना
तयांत मी गुंफियले

सांग फेडायचे कसे
देणे नक्षत्रांचे तुझे
तुझ्या प्रेमाच्या तोडीचे
फक्त हृदयच माझे

तेच अर्पिते मी तुला
देण्या अन्य नसे काही
बाकी काहीही देऊन
ऋण फिटणार नाही

गोड प्रेमाचा वर्षाव
नित्य असा बरसू दे
माझ्या चांदण्याचा गाव
तुझ्या डोळ्यांत वसू दे


--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

Wednesday, April 25, 2012

त्रिवेणी - १

आकाशात आणि मनात
एकाच वेळी मळभ कसं दाटून येतं?
आकाशालाही कुणाची तरी आठवण छळते वाटतं!

------------------------------------------------

रोज तर तुझ्याशी बोलणं होतं
फक्त अमावस्या सोडून....
वेडा चंद्रच त्या रात्री उगवत नाही!

------------------------------------------------

स्वतःची तारीफ स्वतःच करते आता
पण आरशासमोर यायचं टाळते
मेला आरसा खोटं का बोलत नाही?

------------------------------------------------

जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!

------------------------------------------------


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

Thursday, April 19, 2012

तुझं नसणं.... की असणं??

वीणेचे ध्वनी विरले तरी
कंपनं मागे रेंगाळावी
अस्तित्वाच्या खुणा मिटल्या तरी
चाहुल मागे सळसळावी
तसं तुझं भरून राहणं!


समुद्राच्या लाटा लोपल्या तरी
गाज मागे रहावी
पाव्याची धुन थांबली तरी
रुंजी मनात उरावी
तसं तुझं उरून राहणं!


चंदन झिजून संपलं तरी
गंध मागे दरवळावा
मैफिलीतलं गाणं सपलं तरी
सूर मागे रेंगाळावा
तसं तुझं पुरून राहणं!


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

Wednesday, April 18, 2012

शिकस्त

तू दिलेलं सगळंच
मनापासून स्वीकारलेलं..
प्राणप्रिय असल्यागत जपलेलं..
मग तू दिलेली जखम तरी
टाकाऊ कशी असेल?
ठेवलीय जपून ती ही अलवारपणे....
ती कधीच भरून येऊ नये म्हणून काळजी घेते आता
पण ती भळभळूही नये ह्यासाठी
प्रयत्नांची किती शिकस्त करावी लागते माहितीये?

--शुभा मोडक (१३-मार्च-१२)

बोलका ओलावा

तुझ्या माझ्या ओल्या आठवणी
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत

आठवांचं वादळ दाटतं
जेव्हा मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसतो
नयनांच्या पागोळ्यांत

मी अबोल राहिले तरी
हा ओलावाच बोलका होतो
दाटून आलेल्या वादळाचा
मग ढगही हलका होतो

--शुभा मोडक (०७-मार्च-१२)

अबोल वेदना

एक भकासपणा
उगीचच वेढून राहिलेला
एक उदासपणा
उगीचच खेटून राहिलेला

समोर वाट दिसते
म्हणून चालत रहायचं
समईत तेल शिल्लक आहे
म्हणून जळत रहायचं

मनाचा स्वतःशीच संघर्ष
मनाची स्वतःशीच ओढाताण
मनाचीच मनावर फुंकर
मनाचेच मनाला बाण

जखम अशी की
झाकताही येऊ नये
वेदना ठुसठुसली तरी
सांगताही येऊ नये

सर्वांमध्ये मिसळूनही
मी अलग, अलिप्त
एक भावना मनाच्या तळाशी
दडून निद्रिस्त, सुप्त


--शुभा मोडक (२७-फेब्रुवारी-१२)

जिवलग वालं प्रेम

तू न बोलून शहाण्यांच्या पंक्तीत बसणारा
आणि मी बोलून वेड्यांचा किताब मिळवणारी
तुझ्या गाळलेल्या जागा मी भरून घ्यायच्या
"आहे ना?" तुझा दोन शब्दी प्रश्न
ह्या प्रश्नातला "प्रेम" हा अध्यारुत शब्द मी समजून घ्यायचा
"आहे ना! एकदम जिवलग वालं प्रेम आहे!" माझं उत्तर
आणि सोबत माझं एक खळाळतं हास्य..
हा प्रश्नोत्तराचा आपला ठरलेला खेळ! नेहमीचाच !..
हा "जिवलग" शब्द मात्र तुझाच! खास!
पहिल्यांदा ऐकल्यानंतर मला न आवरता आलेलं हसू..
"जिवलग वालं प्रेम??? ते काय असतं??" माझा खोडकर प्रश्न..
आणि उत्तरादाखल तुझी अबोली शांतता
.
.
.
एक सांगू का?
तू न बोलताही मला समजतं तुझ्या मनातलं..
ह्या जीवाचं त्या जीवालाच कळेल असं जे काही ते म्हणजे "जिवलग"!
हो ना?
.
.
.
म्हणून तर..
तुझ्या शांततेचा आवाज पोचतो माझ्यापर्यंत
त्या शांततेला मग मी घालते माझ्या शब्दांचं कोंदण
ते जिवलग वालं प्रेम त्या कोंदणाच्या आत घट्ट धरून ठेवायची
ही माझी वेडी धडपड समज हवं तर.....!

शुभा मोडक (१६-फेब्रुवारी-१२)

जिगसॉ पझल

निवांत वेळ असला की
आयुष्याचं जिगसॉ पझल मी जुळवायला घेते
एक तुकडा सोडून बाकी सगळं चित्र जुळतं
मी ही तो तुकडा शोधण्याच्या भानगडीत पडत नाही
कारण मला माहितीये की तो तुकडा माझ्याजवळ नाहीच मुळी!
तो तर तू घेऊन गेलास तुझ्या सोबत!
नव्हे, मीच तुला तो घेऊन जाऊ दिला
त्या तुकड्याशिवाय माझं चित्र अपूर्ण आहे, ठाऊकाय मला..
पण हे चित्र असंच हवं असतं मला...
ती अपूर्णतेची जाणीव हे तुला आठवण्याचं निमित्त असतं!
अशा वेळी आशा मनात गुणगुणून जाते
"स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा!"
माझ्या स्वप्नातल्या, त्या उमलण्यापूर्वीच खुडलेल्या कळ्या
त्या तुकड्यासोबत तुझ्याजवळ जपून ठेव!
न उमलताही माझ्या आठवणींचा गंध त्या तुला देत राहतील
थोडं माझं "मी" पण ही जडवलं होतं मी त्या तुकड्याला..
ते ही जपून ठेव!
परत जेव्हा स्वतःला हरवून बसेन तेव्हा हक्काने साद घालेन तुला...
बघ... जमलं तर ये!
तेव्हढंच माझं जिगसॉ पझल पूर्ण झाल्याचं समाधान...
थोड्या क्षणांकरता का होईना.....!


शुभा मोडक (१५-फेब्रुवारी-१२)

तुझ्या आठवणींचा चंद्र

आज ना सकाळी गंमतच झाली
सहज म्हणून आकाशात पाहिलं तर चक्क चंद्रकोर दिसली
मनात आलं, दिवसाढवळ्या चंद्रकोर कशी काय उगवली?
आणि मग अचानक आठवलं...
काल रात्री मनाच्या आकाशात काळोख पसरल्यानंतर
तुझ्या आठवणी चंद्र बनून आल्या होत्या
मनाचा कोपरान् कोपरा लख्ख उजळला होता
क्षणापूर्वीची काळी काळोखी माझी रात
मग प्रकाशाचं धुकं लपेटून बसली होती
तुझी एक एक आठवण मग मी चंद्राकडून मागून घेतली
एक एक आठवणीची एक एक चांदणी बनवून आकाशाला टिकल्या लावल्या
या नादात पूर्ण वाटोळा चंद्र कणाकणानं पाझरला
नि चंद्रकोर बनून गेला!
शीतल चांदण्याच्या ऊबदार दुलईत मग माझी पहाट झोपून गेली होती
सकाळ झाल्यावर चांदण्या झाल्या धूसर...
पण चंद्रकोर तशीच राहिली बहुतेक!


शुभा मोडक (१४-फेब्रुवारी-१२)

माझं चांदण्याचं गुपित

रात्री त्याच्या प्रेमाचं चांदणं
माझ्या अंगणात सांडलं
मी वेचायला आले नाही
म्हणून सकाळी माझ्याशी भांडलं

मी म्हटलं, "रुसू नकोस.
आज रात्री ये परत!
चोराला चांदण्याची भीती
कसं नाही तुला कळत?"

"काल यायला निघाले होते
पण घात केला पैंजणांनी
तूच एकटा थोडीच झुरलास
मी ही मेले लाखो मरणांनी"

म्हटलं, "आज एक काम कर.
अंगणाऐवजी खोलीत ये.
खिडकीला थोडी फट ठेवीन.
गुपचूप अंग चोरीत ये."

चांदणं मग आनंदाने वेडावलं
त्यानं हसून "हो" म्हटलंय
"आज पैंजण काढून ठेव"
अशी तंबी देऊन परत गेलंय

रात्री मी तुमच्या मैफिलीत नसेन
तर मला शोधू नका
माझं हे चांदण्याचं गुपित
बाहेर कुठे फोडू नका

शुभा मोडक (१४-फेब्रुवारी-१२)

Tuesday, April 17, 2012

बुडबुडा

'वर्तुळ', 'वर्तुळ' म्हणून कितीदा ओरडशील?
ज्याला 'वर्तुळ' समजतीयेस
ते खरं म्हणजे मुळात 'वर्तुळ' नाहीच्चे,
हे तरी समजलंय का तुला?
तो आहे.... फक्त एक बुडबुडा
वर्तुळाचा त्यात नुसताच आभास!
प्रत्यक्षात तो आहे
एक पारदर्शक, पोकळ, अर्थहीन
असा केवळ एक बुडबुडा
दिशाहीन, उद्देशविहिन
कुठेही भरकटत तरंगणारा एक बुडबुडा
वर्तुळाला छेदण्याची भाषा करतेस!
बुडबुड्याच्या बाबतीत काय करशील?
एक काम कर...
काहीच करू नकोस!
बुडबुडाच तो!
एक दिवस फुटेल आपोआपच!
वाट बघ!
ह्म्म्म.....

तेव्हढी वाट पाहण्याची सहनशक्ती मात्र टिकवून ठेव!


--शुभा मोडक (२३-ऑगस्ट-११)

ढगफुटी

ढगांचं आपलं एक बरं असतं
जड झाले की बरसून मोकळे होतात
मग मी ही ठरवलं
आपणही आता असंच वागायचं
दु:ख, वेदना, राग, संताप
सगळ्या-सगळ्याचा एका क्षणात निचरा करायचा!

पण एखादा चुकार ढग असतोच ना...
तो नाही हा नियम पाळत
वाहत राहतो त्याचं ओझं अव्याहत
पण तरी एक दिवस तो फुटतोच!
पण मग त्याला पाऊस म्हणत नाहीत
त्याला म्हणतात ढगफुटी....!
मी ही त्या अशाच चुकार ढगांपैकी एक!


--शुभा मोडक (२५-ऑगस्ट-११)

मनाचा कॅनव्हास

बांद्रा रेक्लमेशनला म्हणे पावसात बघण्यालायक नजारा असतो.
अफाट वारा
बेफाम पाऊस
उधाणलेला समुद्र!
आणि...........
आणि या चित्राशी एकरूप झालेले कितीतरी "तो" आणि "ती"!
एकाच छत्रीत....एकमेकांच्या मिठीत....
खट्याळ लाटांना अंगावर झेलत ओलेचिंब!
....
....
....
....
मग "मी" कुठे आहे?
"मी" ही आहे की तिथेच...
पण शरीरानं नाही.... मनानं!
कारण मुळात माझ्याच मनाच्या कॅनव्हासवरचं कल्पनाशक्तीच्या कुंचल्याने रंगवलेलं ते चित्र आहे.
पण मग "तू" कुठे आहेस? "तू" कसा दिसत नाहीस या चित्रात??
कारण....
"तू" नाहीसच या चित्रात!
....
....
....
....
आधी "तू" इथं असायचास!
अर्थात पुन्हा मनानेच हं!
पण तुझ्या नाही, माझ्याच मनाने....
तेव्हा खूप सारे संग असायचे सोबतीला
रंगीत छत्र्या, रंगीत कपडे
काळे ढग, करडा पाऊस
निळा समुद्र, निळ्या लाटा
सप्तरंगी इंद्रधनुष्य!
....
....
....
....
आता त्या रंगांचीच भीती वाटते
असं वाटतं अंगावर येतील सगळे रंग धावून!
म्हणून मग आता काळ्या-करड्या रंगातच रंगवते मी चित्रं.
सारे "तो" आणि "ती" यांचे कपडेही करडेच, छत्र्याही काळ्या, समुद्रही काळाच!
ढग तर काळे असतातच.
मग त्यांतून पडणारा पाऊसही काळाच!
आता या चित्राला तरी दृष्ट नको लागू दे...
म्हणून मग चित्राच्या खाली उजव्या कोपर्‍याला एक काळी तीटही लावते!
"तू" नकोच येऊस या अशा चित्रात.
तसं पण रंगविहिन आसमंतात तुला बघायची सवयच नाही या डोळ्यांना...........

--शुभा मोडक (२३-ऑगस्ट-११)

नको ते पाऊसगाणे........!

नाचर्‍या पावसाच्या
आठवणी माझ्या बोचर्‍या आहेत
सरी बरसल्या की "तो" आठवतो
त्या सयी टोचणार्‍या आहेत


नाचर्‍या सरी हातावर झेलल्या
ओंजळ भर घेऊन मिरवल्या
आता त्या वेदनांचे डंख मारतात
त्याच आहेत पाऊसडोहात जपल्या


अंगणात येऊन पाऊस झेलला
गारव्या ऐवजी दाह वाट्याला आला
आता खिडकीतूनच धारा पाहते
भावनांचा बहर गेला


आता नवीन गणित मांडणे नको
पुन्हा ती वेदना साहणे नको
मनाचा डोह ढवळतो
पुन्हा ते पाऊसगाणे नको


--शुभा मोडक (२४-जून-११)

वर्तुळानंतर...

आता मी वर्तुळाला छेदायचं ठरवलंय
गप्प बसून सहन करण्यापेक्षा बोलायचं ठरवलंय


फार फार तर काय होईल??? चाकोरी मोडेल
मोडू देत.....
वाईटात वाईट काय होईल??? मी एकटी पडेन
पडू देत....


मूर्खासारखं त्याच त्याच परिघावर फिरायचं
पुन्हा पुन्हा एकाच बिंदूपाशी येऊन थांबायचं
तेच वर्तुळ परत परत नव्याने गिरमिटायचं


आता बास.....


त्यापेक्षा सरळ रेषेत चाललेलं बरं
मनात आलं की रस्ता बदलता तरी येतो


नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवी दिशा
एका रेषेला एक फाटा
नव्या पंखांना नव्या वाटा


आणि...
अगदीच दमून कुठे थांबायचं म्हटलं तरी
निदान.....
परत त्याच बिंदूपाशी येऊन पोचण्याची अगतिकता तरी नाही!


--शुभा मोडक (०२-डिसेंबर-१०)

तुझा आठव

तुझ्या पैंजणांचा मला भास आहे
तुझ्या चाहुलीची मला आस आहे

तुझ्या कंकणांचा सखे नाद मंजुळ
तुझ्या कुंतलांचा मला पाश आहे

तुला वाहतो नित्य श्वासांतुनी मी
तुझ्या आठवांचा मला ध्यास आहे

कसा साहतो हा दुरावा सखे मी
जरी मीलनाचा मधूमास आहे

--शुभा मोडक (२२-जून-१०)

वर्तुळ

नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवे आकाश
नवे पंख, नवी झेप
...
...
...
...
...
पुन्हा नव्याने......
नवी अंधारी, नवी गर्ता
नव्याने कोसळणे, नव्याने ढासळणे
आणि पुन्हा नव्याने वर्तुळ संपूर्ण....
...
...
...
...
...
आणि मग नव्याने वाट पाहणे...
नव्या उमेदीची......


--शुभा मोडक (२२-एप्रिल-०८)

Monday, April 16, 2012

तो एक वृक्ष

दूर तिकडे त्या माळरानावर
आहे उभा एक वृक्ष वठलेला जीर्ण झालेला
पोखरलेला बुंधा जीर्ण पाने आणि
मोडक्या फांद्या एव्हढीच उरलीय त्याची शोभा

कधी एके काळी हाच होता पांथस्थांचा आसरा
पक्ष्यांचा निवारा अन खुरट्या वेलींचा सहारा

हिरव्यागार पानांनी, घरट्यांनी सदा बहरलेला
लाल तांबड्या फुलांच्या मोहराने सदा सजलेला

एके दिवशी परंतु, आकाशीची ती चपला
आली धरणीवर द्याया तरुला आलिंगन
भस्मसात झाली तरुची शोभा, तरुची छाया
नष्ट झाला पाखरांचा निवारा अकस्मात क्षणार्धात!

आजही एकाकी निष्पर्ण असा दूरवर उभा तो
पण याचा त्याला ना विषाद ना खंत
शांत अविचल स्थिर स्तब्ध उभा तो
अगदी चिरनिद्रा घेतलेल्या बुद्धासारखा!


--शुभा सकळकळे (२८-फेब्रुवारी-९८)

क्षण... तुझे नि माझे

क्षण आपले दोघांचे
कोसळणार्‍या पावसातले
थंडीतही ऊब देणारे
हात तुझे माझ्या हातातले


क्षण आपले दोघांचे
मुक्या मुक्या शब्दांतले
माझ्या अंगी शहारा
आणि हसू तुझ्या ओठांतले


क्षण आपले दोघांचे
घट्ट घट्ट मिठीतले
उरात वादळे श्वासांची
आणि निसटते शब्द कानातले


क्षण आपले दोघांचे
पहाटेच्या दवातले
दोघांचे एकच स्वप्न
इंद्रधनुषी रंगातले


काही क्षण दोघांचे
एकमेकांच्या विरहातले
दुरावा संपण्याची प्रतीक्षा
आणि मीलनाच्या ध्यासातले


--शुभा सकळकळे (१९९९)

अधुरे प्रेम

आपणच तोडायला हवेत
आता सारे बंध
दूर सारायला हवा
हळव्या स्मृतींचा गंध


अलगद सोडवून टाकू
प्रेमाचे हे रेशीमधागे
वळून पहायलाही काही
ठेवायचं नाही मागे


आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे
रंग आपणच पुसायचे
पापण्यांत अश्रू दडवून
जगासमोर हसायचे


आपणच विणलेल्या स्वप्नांना
आपणच देऊ मूठ्माती
या जन्मीचं राहिलेलं प्रेम
राखून ठेवू पुढच्या जन्मासाठी

--शुभा सकळकळे (१९९९)

अबोल नाते

आकाशीच्या रंगपटावर
चमचम करिती असंख्य तारे
सतत त्यांकडे बघता वाटे
क्षणात हाती येतील सारे


तसेच तारे तुझ्या लोचनी
गालांवरती तेज मनोहर
मूक अशा या अधरां वरती
अनामिक हे शब्द निरंतर


या तेजाचे या शब्दांचे
आहे कसले अजोड नाते
तुझ्या नि माझ्या प्रीतीचे ही
तेच अनोखे अबोल नाते!

--शुभा सकळकळे (१९९९)

हमारी हसरत

हमे हसरत तो नही
उनके दिल मे रहने की
लेकीन हम उन्हे
कम से कम याद तो रहे|


हमे हसरत तो नही
उनके दिल के पास रहने की
लेकीन वो हमारे
कम से कम दिल के पास तो रहे|

--शुभा सकळकळे (१९९९)

मला वाटतं...

एकदा पहिल्या पावसात
मी तुझ्या सोबत भिजावं
झाडांच्या पानांवरून ओघळणारं पाणी
तुझ्या मिठीतून पहावं


नकळत डोळ्यांतल्या आसवांनी
मुक्तपणे बरसावं
माझ्या गालावरचं पाणी
तुझ्या ओठांनी अलगद टिपावं


कधी तुझ्याशी भांडून
तुझ्यावर रागवावं, रुसावं
राग ओसरल्यानंतर
तुझ्याच खांद्यावर विसावावं


मी तुझ्यात, तू माझ्यात
एकरुप होऊन जावं
एकमेकांच्या प्रेमात दोघांनी
देहभान हरपून जावं


आपल्या दोघांचं प्रेम
असं असावं
की 'प्रेमा'ने सुद्धा
आपल्यासमोर झुकावं!


--शुभा सकळकळे (१९९९)

लहान होतो...बरं होतं!

लहान होतो तेव्हा बरं होतं
तुझ्या हातात हात गुंफता येत होता
ना जगाचे नियम ना वयाचं बंधन
तेव्हाचा काळ किती निरागस होता


तुला आठवतं? आपलं ते
निरागस हसणं, खेळणं
स्वार्थीपणाचा गंधही नसलेलं
कोवळ्या वयातलं वागणं


मोरपंखी, रेशमी स्वप्नांनी तेव्हा
आयुष्य वेढलेलं होतं
बालपणाच्या कोशात दडलेलं, ते एक
स्वच्छंदी फुलपाखरू होतं


फुलपाखरू हातांतून कधी निसटलं
पत्ताच नाही लागला
आपण तेच, स्पर्शही तोच
पण स्पर्शाचा अर्थच किती बदलला


आता नुसत्या आठवणीने सुद्धा
मन हळवं होतं आणि
वाटतं...
लहान होतो तेच बरं होतं !!


--शुभा सकळकळे (१९९९)

तुझी आठवण

कधी तुझी आठवण
पहाटेच्या गुलाबी थंडीसारखी येते
माझ्या अवती-भवती वावरून
अंगावर गोड शिरशिरी आणते


कधी तुझी आठवण
सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी येते
त्या मऊ रेशमी स्पर्शातून
तुझ्या प्रेमाची ऊब जाणवते


कधी तुझी आठवण
मंद सुगंधासारखी येते
आपल्या गंधित अस्तित्वाने
आसमंत दरवळून टाकते


कधी तुझी आठवण
वार्‍याच्या झुळकेसारखी येते
आपल्या थंड शीतल स्पर्शाने
तप्त जीवाला शांत करते


कधी तुझी आठवण
पहिल्या पावसासारखी येते
तुझ्या सहवासाच्या जाणीवेने
मन चिंब भिजून जाते


अशी तुझी आठवण
दरवेळी नवा अनुभव देते
सांग ना एकदा मला
काय तुलाही कधी असे होत असते?


--शुभा सकळकळे (१९९९)

शिक्षा दुराव्याची

शिक्षा दुराव्याची
सवय झालीये आता
मला तुझ्या नसण्याची
तुझ्या आठवणींसोबत
कुढत कुढत जगण्याची


तुझ्या जवळ असताना
मला प्रेम नाही उमगलं
प्रेम कशाला म्हणतात
ते दुराव्याने शिकवलं


आता जाणवतंय
तू दूर गेल्यावर
कसं वाटतं मनाला
आपलं कुणी नसल्यावर


अजूनही मला आशा आहे
तुझ्या परत येण्याची
नाहीतर भोगायची आहेच
शिक्षा दुराव्याची!


--शुभा सकळकळे (१९९९)

देशील तू साद?


तू समोर आलास की
शब्द ओठांआडच राहतात
तू दूर गेलास की
हवेत विरून जातात


रोज निर्धार करते
आज तुला सांगायचंच
पण शब्द अडखळतात
अन् घडत जातं नेहेमीसारखंच!


मी ठरवलंय, आज
तुला सर्व काही सांगणार
पण, तू माझ्या प्रेमाचा
अव्हेर तर नाही ना करणार?


माझ्या प्रेमाच्या हाकेला
देशील तू साद?
जगाने पाठ फिरवली
तरी देशील मला साथ?


--शुभा सकळकळे (१९९९)

जवळीक


तू इतकी जवळीक करू नकोस
माझा मनावर ताबा राहत नाही
तू जवळ असलास की
माझं मन मला जुमानत नाही


तसं मनाला बजावलंय मी
की असा वेडेपणा करायचा नाही
पण मन मोठं हट्टी आहे
त्याला तुझ्याशिवाय राहवत नाही


मनात तुझा विचार नाही
असा एक क्षण जात नाही
म्हणूनच इतकं जवळ येऊ नकोस
माझा माझ्यावरच विश्वास राहत नाही

--शुभा सकळकळे (१९९९)

मी मुक्त

काल मी स्वतःलाच
चितेवर जळताना पाहिलं
या जगापासून सुटका झाली
म्हणून कसं हलकं हलकं वाटलं


जगत होतो तेव्हा कुणालाच
माझी काळजी नाही वाटली
पण मेल्यावर पहायला
सर्वांचीच गर्दी दाटली


या जगात जगायलाही
कायदे आहेत, निर्बंध आहेत
दुनियेचे कायदेकानून पाळत जगणं
मला अमान्य आहे


जगणारे जगतात
आयुष्याचं गाडं रेटत राहतात
वीतभर पोटासाठी
तडजोड करतच जातात


या जगात येताना
एकटाच आलो, एकटाच जगलो
मनाला वाटेल तेच
आणि तसंच करत आलो


म्हणूनच हे जग
मला नाही मानवलं
आणि मी स्वतःला
मृत्यूच्या हाती सोपवलं


आता मात्र मी
खुश आहे, आनंदीत आहे
कारण जगाच्या कायद्यांपासून
मी मुक्त आहे


--शुभा सकळकळे (१९९९)

जयद्रथ-वध

९वीत शिकत असताना शाळेतील सौ. देशपांडे मॅडम (या आम्हांला मराठी भाषा विषय शिकवीत असत) यांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाने "ओंजळ" नावाचा हस्तलिखित काव्यसंग्रह बनविला होता. वर्गातील जवळपास प्रत्येकाने लेखन, संपादन, चित्रकला (अंतर्गत चित्रे), मुखपृष्ठ रेखाटन अशा काही ना काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

त्याच वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाला प्रवीण दवणे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांना आम्ही तो काव्यसंग्रह दाखवून त्यांची शाबासकी मिळविली होती. आमच्या या प्रयत्नांना अभिप्राय म्हणून त्यांनी उत्स्फुर्तपणे एक कविता तयार करून त्या काव्यसंग्रहाच्या पाठीमागच्या पानावर स्वहस्ताक्षरात लिहून दिली होती. नंतर बरेच दिवस तो काव्यसंग्रह वर्गातल्या प्रत्येकाच्या घरी आळीपाळीने फिरत होता. आता नक्की कुणाकडे आहे देव जाणे! त्यामध्ये मी आणि माझी एक वर्गमैत्रिण दीपा पडियार अशा आम्ही दोघींनी मिळून एक कविता लिहिली होती. एक आठवण म्हणून इथे नोंद करते आहे:

जयद्रथ-वध
करुनि अभिमन्युचा वध,
राक्षसापरी हासे तो जयद्रथ!

जेव्हा कळे वर्तमान अर्जुनास,
जयद्रथ वधाचा त्यास लागे ध्यास

उदयिक मारुनि ठार जयद्रथास,
करिन पूर्ण मी माझी आस

अथवा होऊनि समर्पित अग्नीस,
पितृछत्र देईन स्वर्गात अभिमन्युस!

ऐकुनि अर्जुनाचा हा अटळ प्रण,
भिऊनि जयद्रथ न गाठे समरांगण

शोधितसे जयद्रथास व्याकुळ होऊनि पार्थ,
करावयास अपुला प्रण सार्थ

दुसरे दिनी कृष्ण करी चमत्कार,
करी ऊभा सूर्याभोवती ढगांचा पहाड!

येई जयद्रथ बाहेर दिन ढळला वाटून,
तेथे पेटे चिता अर्जुनाची धडाडून

पहा तरी त्या ईश्वराची लीला अफाट,
येति सूर्यदेव फाडूनि मेघांचा आंतरपाट!

माधव म्हणे, तो पहा सूर्य अन तो जयद्रथ,
चितेवरचा अर्जुन घेई अचूक शब्दवेध!

घेई पार्थ सूड अपुल्या पुत्रवधाचा,
विसावे तो बाण घेऊनि छेद जयद्रथ कंठनाळाचा!


-कु. शुभा सकळकळे
कु. दीपा पडियार
९ "अ" (१९९६-९७)

खरंच कधीकधी....

खरंच कधीकधी असं वाटतं
आपण एकटंच असावं
मनसोक्त हसावं, मनसोक्त रडावं
आणि अश्रु पुसायलाही कोणी नसावं

खरंच कधीकधी असं वाटतं
कुणीतरी 'माझं' जवळ असावं
त्याला मी माझं सर्वस्व द्यावं
आणि मी त्याच्याशी एकरुप व्हावं


--शुभा सकळकळे (१९९९)

तू

तू सोबत असलास की
सगळंच कसं चांगलं वाटतं
एरवी नकोसं वाटणारं
हे जीवन हवंहवंसं वाटतं

चांदण्या रात्री समुद्रकिनारी
हातात हात गुंफून फिरताना
कसं सांगू काय काय वाटतं
तू जवळ असताना

सर्व जगाचा विसर पडतो
तुझ्या डोळ्यांत पाहताना
माझी मी ही उरत नाही
तुझ्या नि:शब्द मिठीत सामावताना

तुझे बोलके डोळे, तुझा रेशमी स्पर्श
बरंच काही सांगून जातो
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण
हवाहवासा वाटतो

ह्या मुक्या नि:शब्द क्षणांना
मी मनात कायमचं जपलंय
कारण तुझ्यावरच्या असीम प्रेमातच
माझं 'माझंपण' लपलंय


--शुभा सकळकळे (१९९९)

Thursday, April 12, 2012

प्रतीक्षा

युगानुयुगे संपली
तुझीच वाट पाहिली
खुळी ही राधिका तुझी
पहा खुळीच राहिली

षड्ज भावनेतले
न मागता तू जे दिले
तुझ्या सुरांत नाहण्या
मनी जपून ठेविले

सावळ्या गगनातला
पयोद हा निनादतो
तुझेच रुप लेवुनी
तना-मनात सांडतो

तू एकदा फिरून ये
हे एव्हढेच मागणे
अन् पुनश्च वर्षु दे
अमोघ प्रीत-चांदणे


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

Wednesday, April 11, 2012

दिल के नगमे - २

आजकल ना जाने क्यु
हम गुमसूम से रहते है|
हर घडी हर पल
आपही के खयालों मे गूम से रहते है|

-----------------------------------------

जिंदगी मे इस कदर शामील हो तुम
तुम्हे ना पाके भी हासिल हो तुम
तुफानोंसे भरे समंदर मे
मेरे दिल का साहिल हो तुम|

-----------------------------------------

ना जीते है ना मरते है
सिर्फ आहें भरते रहते है|
आपके खयालों मे
रातभर जागते रहते है|

-----------------------------------------

बनावट की इस दुनिया मे
एक तुम ही सच्चे लगे|
खामीयाँ तो तुम मे भी थी
फिर भी दिल को अच्छे लगे|

-----------------------------------------

काश आपको सीने से लगा पाते
जैसे आपकी तसवीर को लगा लेते है|
काश आपसे वो बात कह पाते
जो आपकी तसवीर से कर लेते है|

-----------------------------------------
दिल का भी एक दिल है
जिसमें तुम्हे बसाया है|
तुम्हारी प्यार भरी निगाहे
बस्स इतनाही किराया है|

-----------------------------------------

दिल के भी कुछ उसूल है
दुनिया से ज़रा निराले है|
किसने कहा दर्द खुशी नही देते
इस दिल ने तो सौ दर्द पाले है|

-----------------------------------------

खुद को करीब से देखना छोड दिया हमने
अपनी तकदीर पे इतराना छोड दिया हमने
जब भलाई का जमाना ही ना रहा
शराफत दिखाना छोड दिया हमने|

---शुभा मोडक

दिल के नगमे - १

हमारे दिल का उनके लिये धडकना
ये अब रोज़ की बात है|
मगर उन्होने हमारे दिल का हाल ना जाना
ये अफ़सोस की बात है|

-----------------------------------

जिसे दिल महसूस कर सके
वो एहसास हो तुम
हर घडी हर पल
मेरे दिल के पास हो तुम

-----------------------------------
तेरी याद मे ओ दिलबर
रात रातभर नींद हमे आती नही|
कितनी कोशिश की हमने
पर दिल से तेरी याद जाती नही|

-----------------------------------

आप जुबाँ से कुछ ना कहो
आपकी खामोशी सब कह जाती है|
जो जिंदगीभर ना भुला पाऊ
दिल पे ऐसा असर कर जाती है|
-----------------------------------

ये खामोशी ये तनहाई
अब हमे अच्छी लगने लगी है|
तुने कही हर बात
अब हमे सच्ची लगने लगी है|

-----------------------------------

दिल ने ऐसा दर्द दिया
फिर भी मैने दिल का साथ ना छोडा|
जिंदगी ने सौ बार ठुकराया
फिर भी मैने जिंदगी का हाथ ना छोडा|

-----------------------------------

ना जाने कब कैसे
मोहोब्बत करने लगे है|
अब हम किसी से नही
बस्स खुद ही से डरने लगे है|

---शुभा मोडक

Friday, March 30, 2012

का रे दुरावा.. का रे अबोला..

मी पुरेपूर ओळखून आहे
तुझं खोटं खोटं रुसणं
आणि मी समजूत काढताना
तुझं गालातल्या गालात हसणं

----------------------------------------

जवळिकीपेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच आणखी घट्ट करतो

----------------------------------------

तू अबोला धरल्यापासून
माझेही शब्द रुसलेत
मी समजूत काढत नाही म्हणून
मूग गिळून गप्प बसलेत
----------------------------------------

माझा राग आणि आसवे
एका पाठोपाठ बरसतात
कसं कळत नाही तुला
ती तुझ्या शब्दांना तरसतात


--शुभा मोडक

क्षण आठवांचे

अजूनही मी खिडकीत उभी असते
तू येतोस का ते पाहण्यासाठी
ये ना कधीतरी असाच
माझं मन राखण्यासाठी

---------------------------------------

काही आठवणी मनात
कायमच्या जपायच्या असतात
आसपास कुणी नसलं
की हळुवार उलगडायच्या असतात

---------------------------------------

तू जवळ नसलास की
तुझ्या आठवणी सोबत करतात
अधीर वेड्या माझ्या मनाला
विरहात त्याच दिलासा देतात

---------------------------------------

आठवांचे ढग दाटले
मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसला
नयनांच्या पागोळ्यांत

---------------------------------------

अजूनही मला स्वय होत नाही
तू जवळ नसण्याची
पण सवय करावीच लागेल
फक्त आठवणींसोबत जगण्याची

---------------------------------------

तू दिलेला प्रत्येक क्षण
मी पुन्हा पुन्हा आठवते
जुन्याच आठवणी मनात
पुन्हा नव्याने साठवते

---------------------------------------

तुझ्या-माझ्या ओल्या आठवणी
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत

--शुभा मोडक

मन पाऊस पाऊस..

तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले

----------------------------

गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं

----------------------------

पावसाचं आणि मनाचं
काय नातं आहे समजत नाही
दोघंही एकदमच पिसाळतात
मी ही मग त्यांना आवरत नाही

----------------------------

ढगांचा नगारा
वीजेची टिपरी
धारांची तडतड
पाऊस माझ्या उंबरी

----------------------------

ह्या वर्षीचा पाऊस
मुक्यानेच बरसेल
कारण तो तुझ्या
मल्हाराला तरसेल

----------------------------

तू पाठ फिरवलीस तरी
पाऊस आपलं नातं पाळतो
तुझी आठवण आली की
माझ्यासह दोन टिपं तो ही गाळतो

--शुभा मोडक

डोळे हे जुलमी गडे!

जे तुझ्या ओठांवर येत नाही
ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं
म्हणूनच तू न सांगता सुद्धा
मला तुझ्या मनातलं कळतं

----------------------------------

कसं जमतं तुला हे
नजरेने संवाद साधणं
एक शब्दही न बोलता
सर्व भावना व्यक्त करणं

----------------------------------

शब्दावाचून जाणून घे तू
भाव माझ्या मनातला
हळूच अलगद टिपून घे तू
अर्थ मुक्या शब्दातला

----------------------------------

शब्दांपेक्षा तुझी अबोल शांतताच
मला अधिक आवडते
कारण शब्दांपेक्षा तीच
अधिक जवळीक साधते

----------------------------------

सगळ्याच गोष्टी ओठांवर येत नाहीत
त्या नजरेतून व्यक्त करायच्या असतात
शब्दांची सोबत नसली तरी
आपोआप जाणून घ्यायच्या असतात

--शुभा मोडक

Thursday, March 29, 2012

मुक्यानेच आलापितो तान माझी

तुझ्या पैंजणांचा मला भास आहे
तुझ्या चाहुलीची मला आस आहे

तुझ्या कंकणांचा सखे नाद मंजुळ
तुझ्या कुंतलांचा तिढा खास आहे

तुझे वाहणे नित्य श्वासांत माझ्या
तुझ्या आठवांचा मला ध्यास आहे

सुखाचीच आंदोलने पेलताना
मनाच्या व्यथांचा जरा त्रास आहे

सुखाचे निवारे अता टाळतो मी
मनाच्या व्यथांचा बरा त्रास आहे

कसा साहतो हा दुरावा सखे मी
जरी मीलनाचा मधूमास आहे

मुक्यानेच आलापितो तान माझी
मुक्या हुंदक्यांचा गळा फास आहे

--शुभा मोडक (२०-मार्च-२०१२)

का वेदनेस माझ्या

का वेदनेस माझ्या त्रासून साहते मी
दु:खातही जरासे हासून पाहते मी

का भेट ती अधूरी स्वप्नास जन्म देई
आभास हा कळे पण आशेत नाहते मी

कृष्णास भजति सारे मज वेड राधिकेचे
कृष्णास पूजिणार्‍या राधेस बाहते मी

आहेच शाप येथे स्वप्नास भंगण्याचा
स्वप्नील पण मनाच्या दुनियेत राहते मी

का श्वासही उरावा जावा सरून तो ही
जखमा उरातल्या ह्या कित्येक साहते मी

गझलेस आजवरही ना स्पर्शिले कधी मी
पहिलेच पुष्प माझे गझलेस वाहते मी

--शुभा मोडक (१६-मार्च-२०१२)

[बाहणे = पूजणे/ भक्ती करणे
विदर्भात झालेला भजणे चा बाहणे हा अपभ्रंश असावा. गजानन महाराजांच्या श्री दासगणु विरचित पोथीमध्ये "भजणे" यासाठी "बाहणे" हा शब्दप्रयोग वापरला आहे]

कम्बख्त़


रोज़ तो उनसे बात होती है
बस एक अमावस की रात छोडके
कम्बख्त़ चाँद जो उस रात निकलताही नही|

मरहम लगाते फिरते है
रोज़ दुसरोंके जख़मोंपर
कम्बख्त़ अपनाही जख़म है जो भरताही नही|

खुदकी तारीफ़ खुदही कर लेते है
मगर आईने के सामने आते नही
कम्बख्त़ शीशा कभी झूठ बोलताही नही|

मंझि़लें कब की अलग हो गई
राहें भी हो गई कब की जुदा
कम्बख्त़ दिल है के मुडताही नही|

तय करते है रोज़
आज से ना चाहेंगे तुम्हे
कम्बख्त़ प्यार है जो कम होताही नही|
                
--शुभा मोडक (२८-मार्च-२०१२)