Thursday, May 10, 2012

संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

संदर्भ - संयम आणि मोह


 
सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामध्ये
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

No comments:

Post a Comment