Wednesday, May 13, 2015

काव्यसमाधी

कविता क्वचित चढते मला अंमळशी
पण मी आत्मभान विसरत नाही
वाट असते नाजुक निसरडी
पण पाऊल माझं घसरत नाही

मग, कवितेला राग येतो
म्हणे, ही बधत कशी नाही
हिला फशी पाडण्याची
युक्ती मला साधत कशी नाही

मलाही मग तिची कीव येते
मी म्हणते, होऊ दे तुझी सरशी
तूच घेशील मला सांभाळून
मला चिंता नको फारशी

गुंगी नि भानाच्या कक्षेत मग
जाणिवांचा लंबक फिरत राहतो
कसा कुठून कधी न कळे
पण, शब्द शब्द झरत जातो

पुन्हा एक नवी कविता
नवा प्रसव नवी वेदना
जितका अंमल जास्त तीव्र
तितकी जास्त तीव्र चेतना

झडीवर झडी बरसून गेल्यावर
जुनंच आभाळ पुन्हा होतं लख्ख
क्षणांपूर्वीचं धूसर चित्र
पुन्हा दिसू लागतं टक्क

नशा विरते, झिंग उतरते
होतो सोहळा कातर निरोप-क्षणांचा
पुढची काव्यसमाधी लागेस्तोवर
झेलायचा शिक्का जागलेपणाचा

--शुभा मोडक
०८-मे-२०१५

Tuesday, October 23, 2012

अलिखित करार

तुझ्या-माझ्यात
आहेत काही अलिखित करार
काही अबोल नियम
तू ही पाळतोस कसोशीने
आणि मी ही असोशीने...

शब्दांशिवायच संमत झालेले काही ठराव
आणि मूक डोळ्यांनी स्वाक्षरी केलेले करार - मदार
उमगतात तुलाही – मलाही...

जगणं सोपं (की अवघड?) करून गेलेले क्षण
निभावतात मग मुक्या साक्षीदारांची भुमिका
त्या अलिखित करारपत्रांवरली
ही एकच गोष्ट फक्त लिखित स्वरुपातली!

--शुभा मोडक
(२३-ऑक्टोबर-१२)

Sunday, June 17, 2012

रेशीमगाठ

तुझा माझा रेशमी बंध..
ती गाठ रेशमीच राहू दे
.
सुती गाठ किती घट्ट बसते माहितीये ना?
सोडवू म्हणता सोडवता येत नाही...
उलट सोडवण्याच्या नादात अजूनच घट्ट होत जाते!
जितकी जास्त आवळली जाते तितके जास्त वळ!
आणि मग ओढाताणीत तुटतेच ती
किंवा दोर कापून टाकावे लागतात...
तरीही उमटलेले वळ स्वतःची खूण सोडतातच मागे..
कधी हुळहुळती... कधी भळभळती!
.
रेशीमगाठीचं तसं नाही!
जितकी अलगद बसते तितकीच अलगद सुटतेही!
आणि सुटतानाही कुठल्याही वळाचा लवलेशही नाही 
उलट मऊसुत झुळझुळत्या स्पर्शाची अनुभूती..
.
.
एक मात्र आहे!
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं अस्तित्त्व मात्र नाकारता येत नाही!
मनातला एक हळवा कोपरा पकडून त्या बसतातच ठाण मांडून!
.
.
पण तरी,
आपल्या मनातलं कुणाला बघता येत नाही हे किती चांगलंय ना!
म्हणूनच म्हणते!
ही रेशीमगाठ रेशमीच राहू दे!

शुभा मोडक (०६-जून-१२)

Thursday, May 17, 2012

फुंकर

फुंकर घालायचीच असेल तर
थेट जखमेवरच घातली पाहिजे असं नाही...
जखम शरीरावर असली तरी वेदना मनातही असते
तिथेच घालायची फुंकर.... अलवारपणे...
.
.
शरीरावरचा घाव कधी ना कधी होईलच बरा!
फार फार तर सोडेल एखादा फिकुटलासा व्रण...
पण मनातला सल वेळीच नाही उपटला
तर...
रुतत जातो आत!
त्यालाच आधी करून टाकायचा नाहीसा!
.
..
आणि हो!
त्यासाठी प्रत्येक जखमेचं मूळ माहीत असायलाच हवं
याची काही आवश्यकता नाही!
.
..
हे शिकलेय.... तुझ्याकडूनच!


--शुभा मोडक (२३-एप्रिल-१२)

Thursday, May 10, 2012

संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

संदर्भ - संयम आणि मोह


 
सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामध्ये
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

Tuesday, May 8, 2012

अभी भी..........

फडफडाते है अभी भी यादोंके कुछ पन्ने
जिनपे अपने निशान छोडे थे तुमने कभी....

महकती है अभी भी कभी कबार सांसे
तुम्हारी सांसो ने जिनको छुआ था कभी....

थरथराता है अभी भी शर्म से मेरा बदन
तुम्हारी बाहोंने जिसे समेटा था कभी....

भर आती है अभी भी आँखे युं ही बिना बात के
तुम्हारे सपने जिनमे सजाये थे कभी....

दोहराते है अभी भी मेरे होठ उन्ही नगमोंको
तुम्हारे होठोंने जिनको छेडा था कभी....

हां, धडक लेता है अभी भी ये दिल
तुम्हारे प्यार ने जिसे जि़ंदा किया था कभी....


--शुभा मोडक (०८-मे-२०१२)

Wednesday, May 2, 2012

संयम आणि मोह

एकच कविता २ वेगवेगळ्या प्रकारे सूचली होती. दोन्हीतला मूळ आशय सारखाच असला तरी शेवटाकडे एक सूक्ष्मसा फरक आहे. म्हणून शीर्षकेही वेगवेगळी दिली आहेत.

संयम की मोह?

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे, त्याचं काय करू?
आता बघायचं कोण जिंकतं?
संयम...... की मोह?


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संयम आणि मोह

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
आणि मग घेतली संयमाची झूल पांघरून
पण काही चुकार आठवणी बधतच नाहीत
येतातच इवल्याश्या फटीतूनही
सरकत बाहेर...
मोह होतोच मग त्यांना कवटाळण्याचा
घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)
मग मात्र देते जबरदस्तीने परत धाडून
फटीतूनच सावकाश...
पण तुझ्याच आठवणी त्या!
तुझ्याइतक्याच बदमाष!
फटीआडूनही मिश्किल डोळ्यांनी डोकावतच राहतात
मग मात्र पुन्हा घेते संयमाने पाठ फिरवून!
आता....
असाच चालू रहायचा हा खेळ निरंतर..
कधी संयमाची सरशी
तर कधी मोहाची जीत!
..
.
.
चालायचंच!

--शुभा मोडक (२६-एप्रिल-१२)