Friday, March 30, 2012

का रे दुरावा.. का रे अबोला..

मी पुरेपूर ओळखून आहे
तुझं खोटं खोटं रुसणं
आणि मी समजूत काढताना
तुझं गालातल्या गालात हसणं

----------------------------------------

जवळिकीपेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच आणखी घट्ट करतो

----------------------------------------

तू अबोला धरल्यापासून
माझेही शब्द रुसलेत
मी समजूत काढत नाही म्हणून
मूग गिळून गप्प बसलेत
----------------------------------------

माझा राग आणि आसवे
एका पाठोपाठ बरसतात
कसं कळत नाही तुला
ती तुझ्या शब्दांना तरसतात


--शुभा मोडक

क्षण आठवांचे

अजूनही मी खिडकीत उभी असते
तू येतोस का ते पाहण्यासाठी
ये ना कधीतरी असाच
माझं मन राखण्यासाठी

---------------------------------------

काही आठवणी मनात
कायमच्या जपायच्या असतात
आसपास कुणी नसलं
की हळुवार उलगडायच्या असतात

---------------------------------------

तू जवळ नसलास की
तुझ्या आठवणी सोबत करतात
अधीर वेड्या माझ्या मनाला
विरहात त्याच दिलासा देतात

---------------------------------------

आठवांचे ढग दाटले
मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसला
नयनांच्या पागोळ्यांत

---------------------------------------

अजूनही मला स्वय होत नाही
तू जवळ नसण्याची
पण सवय करावीच लागेल
फक्त आठवणींसोबत जगण्याची

---------------------------------------

तू दिलेला प्रत्येक क्षण
मी पुन्हा पुन्हा आठवते
जुन्याच आठवणी मनात
पुन्हा नव्याने साठवते

---------------------------------------

तुझ्या-माझ्या ओल्या आठवणी
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत

--शुभा मोडक

मन पाऊस पाऊस..

तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले

----------------------------

गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं

----------------------------

पावसाचं आणि मनाचं
काय नातं आहे समजत नाही
दोघंही एकदमच पिसाळतात
मी ही मग त्यांना आवरत नाही

----------------------------

ढगांचा नगारा
वीजेची टिपरी
धारांची तडतड
पाऊस माझ्या उंबरी

----------------------------

ह्या वर्षीचा पाऊस
मुक्यानेच बरसेल
कारण तो तुझ्या
मल्हाराला तरसेल

----------------------------

तू पाठ फिरवलीस तरी
पाऊस आपलं नातं पाळतो
तुझी आठवण आली की
माझ्यासह दोन टिपं तो ही गाळतो

--शुभा मोडक

डोळे हे जुलमी गडे!

जे तुझ्या ओठांवर येत नाही
ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं
म्हणूनच तू न सांगता सुद्धा
मला तुझ्या मनातलं कळतं

----------------------------------

कसं जमतं तुला हे
नजरेने संवाद साधणं
एक शब्दही न बोलता
सर्व भावना व्यक्त करणं

----------------------------------

शब्दावाचून जाणून घे तू
भाव माझ्या मनातला
हळूच अलगद टिपून घे तू
अर्थ मुक्या शब्दातला

----------------------------------

शब्दांपेक्षा तुझी अबोल शांतताच
मला अधिक आवडते
कारण शब्दांपेक्षा तीच
अधिक जवळीक साधते

----------------------------------

सगळ्याच गोष्टी ओठांवर येत नाहीत
त्या नजरेतून व्यक्त करायच्या असतात
शब्दांची सोबत नसली तरी
आपोआप जाणून घ्यायच्या असतात

--शुभा मोडक

Thursday, March 29, 2012

मुक्यानेच आलापितो तान माझी

तुझ्या पैंजणांचा मला भास आहे
तुझ्या चाहुलीची मला आस आहे

तुझ्या कंकणांचा सखे नाद मंजुळ
तुझ्या कुंतलांचा तिढा खास आहे

तुझे वाहणे नित्य श्वासांत माझ्या
तुझ्या आठवांचा मला ध्यास आहे

सुखाचीच आंदोलने पेलताना
मनाच्या व्यथांचा जरा त्रास आहे

सुखाचे निवारे अता टाळतो मी
मनाच्या व्यथांचा बरा त्रास आहे

कसा साहतो हा दुरावा सखे मी
जरी मीलनाचा मधूमास आहे

मुक्यानेच आलापितो तान माझी
मुक्या हुंदक्यांचा गळा फास आहे

--शुभा मोडक (२०-मार्च-२०१२)

का वेदनेस माझ्या

का वेदनेस माझ्या त्रासून साहते मी
दु:खातही जरासे हासून पाहते मी

का भेट ती अधूरी स्वप्नास जन्म देई
आभास हा कळे पण आशेत नाहते मी

कृष्णास भजति सारे मज वेड राधिकेचे
कृष्णास पूजिणार्‍या राधेस बाहते मी

आहेच शाप येथे स्वप्नास भंगण्याचा
स्वप्नील पण मनाच्या दुनियेत राहते मी

का श्वासही उरावा जावा सरून तो ही
जखमा उरातल्या ह्या कित्येक साहते मी

गझलेस आजवरही ना स्पर्शिले कधी मी
पहिलेच पुष्प माझे गझलेस वाहते मी

--शुभा मोडक (१६-मार्च-२०१२)

[बाहणे = पूजणे/ भक्ती करणे
विदर्भात झालेला भजणे चा बाहणे हा अपभ्रंश असावा. गजानन महाराजांच्या श्री दासगणु विरचित पोथीमध्ये "भजणे" यासाठी "बाहणे" हा शब्दप्रयोग वापरला आहे]

कम्बख्त़


रोज़ तो उनसे बात होती है
बस एक अमावस की रात छोडके
कम्बख्त़ चाँद जो उस रात निकलताही नही|

मरहम लगाते फिरते है
रोज़ दुसरोंके जख़मोंपर
कम्बख्त़ अपनाही जख़म है जो भरताही नही|

खुदकी तारीफ़ खुदही कर लेते है
मगर आईने के सामने आते नही
कम्बख्त़ शीशा कभी झूठ बोलताही नही|

मंझि़लें कब की अलग हो गई
राहें भी हो गई कब की जुदा
कम्बख्त़ दिल है के मुडताही नही|

तय करते है रोज़
आज से ना चाहेंगे तुम्हे
कम्बख्त़ प्यार है जो कम होताही नही|
                
--शुभा मोडक (२८-मार्च-२०१२)