Thursday, March 29, 2012

मुक्यानेच आलापितो तान माझी

तुझ्या पैंजणांचा मला भास आहे
तुझ्या चाहुलीची मला आस आहे

तुझ्या कंकणांचा सखे नाद मंजुळ
तुझ्या कुंतलांचा तिढा खास आहे

तुझे वाहणे नित्य श्वासांत माझ्या
तुझ्या आठवांचा मला ध्यास आहे

सुखाचीच आंदोलने पेलताना
मनाच्या व्यथांचा जरा त्रास आहे

सुखाचे निवारे अता टाळतो मी
मनाच्या व्यथांचा बरा त्रास आहे

कसा साहतो हा दुरावा सखे मी
जरी मीलनाचा मधूमास आहे

मुक्यानेच आलापितो तान माझी
मुक्या हुंदक्यांचा गळा फास आहे

--शुभा मोडक (२०-मार्च-२०१२)

No comments:

Post a Comment