Friday, March 30, 2012

मन पाऊस पाऊस..

तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले

----------------------------

गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं

----------------------------

पावसाचं आणि मनाचं
काय नातं आहे समजत नाही
दोघंही एकदमच पिसाळतात
मी ही मग त्यांना आवरत नाही

----------------------------

ढगांचा नगारा
वीजेची टिपरी
धारांची तडतड
पाऊस माझ्या उंबरी

----------------------------

ह्या वर्षीचा पाऊस
मुक्यानेच बरसेल
कारण तो तुझ्या
मल्हाराला तरसेल

----------------------------

तू पाठ फिरवलीस तरी
पाऊस आपलं नातं पाळतो
तुझी आठवण आली की
माझ्यासह दोन टिपं तो ही गाळतो

--शुभा मोडक

No comments:

Post a Comment