Wednesday, May 13, 2015

काव्यसमाधी

कविता क्वचित चढते मला अंमळशी
पण मी आत्मभान विसरत नाही
वाट असते नाजुक निसरडी
पण पाऊल माझं घसरत नाही

मग, कवितेला राग येतो
म्हणे, ही बधत कशी नाही
हिला फशी पाडण्याची
युक्ती मला साधत कशी नाही

मलाही मग तिची कीव येते
मी म्हणते, होऊ दे तुझी सरशी
तूच घेशील मला सांभाळून
मला चिंता नको फारशी

गुंगी नि भानाच्या कक्षेत मग
जाणिवांचा लंबक फिरत राहतो
कसा कुठून कधी न कळे
पण, शब्द शब्द झरत जातो

पुन्हा एक नवी कविता
नवा प्रसव नवी वेदना
जितका अंमल जास्त तीव्र
तितकी जास्त तीव्र चेतना

झडीवर झडी बरसून गेल्यावर
जुनंच आभाळ पुन्हा होतं लख्ख
क्षणांपूर्वीचं धूसर चित्र
पुन्हा दिसू लागतं टक्क

नशा विरते, झिंग उतरते
होतो सोहळा कातर निरोप-क्षणांचा
पुढची काव्यसमाधी लागेस्तोवर
झेलायचा शिक्का जागलेपणाचा

--शुभा मोडक
०८-मे-२०१५