Thursday, May 17, 2012

फुंकर

फुंकर घालायचीच असेल तर
थेट जखमेवरच घातली पाहिजे असं नाही...
जखम शरीरावर असली तरी वेदना मनातही असते
तिथेच घालायची फुंकर.... अलवारपणे...
.
.
शरीरावरचा घाव कधी ना कधी होईलच बरा!
फार फार तर सोडेल एखादा फिकुटलासा व्रण...
पण मनातला सल वेळीच नाही उपटला
तर...
रुतत जातो आत!
त्यालाच आधी करून टाकायचा नाहीसा!
.
..
आणि हो!
त्यासाठी प्रत्येक जखमेचं मूळ माहीत असायलाच हवं
याची काही आवश्यकता नाही!
.
..
हे शिकलेय.... तुझ्याकडूनच!


--शुभा मोडक (२३-एप्रिल-१२)

Thursday, May 10, 2012

संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

संदर्भ - संयम आणि मोह


 
सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामध्ये
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

Tuesday, May 8, 2012

अभी भी..........

फडफडाते है अभी भी यादोंके कुछ पन्ने
जिनपे अपने निशान छोडे थे तुमने कभी....

महकती है अभी भी कभी कबार सांसे
तुम्हारी सांसो ने जिनको छुआ था कभी....

थरथराता है अभी भी शर्म से मेरा बदन
तुम्हारी बाहोंने जिसे समेटा था कभी....

भर आती है अभी भी आँखे युं ही बिना बात के
तुम्हारे सपने जिनमे सजाये थे कभी....

दोहराते है अभी भी मेरे होठ उन्ही नगमोंको
तुम्हारे होठोंने जिनको छेडा था कभी....

हां, धडक लेता है अभी भी ये दिल
तुम्हारे प्यार ने जिसे जि़ंदा किया था कभी....


--शुभा मोडक (०८-मे-२०१२)

Wednesday, May 2, 2012

संयम आणि मोह

एकच कविता २ वेगवेगळ्या प्रकारे सूचली होती. दोन्हीतला मूळ आशय सारखाच असला तरी शेवटाकडे एक सूक्ष्मसा फरक आहे. म्हणून शीर्षकेही वेगवेगळी दिली आहेत.

संयम की मोह?

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे, त्याचं काय करू?
आता बघायचं कोण जिंकतं?
संयम...... की मोह?


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संयम आणि मोह

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
आणि मग घेतली संयमाची झूल पांघरून
पण काही चुकार आठवणी बधतच नाहीत
येतातच इवल्याश्या फटीतूनही
सरकत बाहेर...
मोह होतोच मग त्यांना कवटाळण्याचा
घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)
मग मात्र देते जबरदस्तीने परत धाडून
फटीतूनच सावकाश...
पण तुझ्याच आठवणी त्या!
तुझ्याइतक्याच बदमाष!
फटीआडूनही मिश्किल डोळ्यांनी डोकावतच राहतात
मग मात्र पुन्हा घेते संयमाने पाठ फिरवून!
आता....
असाच चालू रहायचा हा खेळ निरंतर..
कधी संयमाची सरशी
तर कधी मोहाची जीत!
..
.
.
चालायचंच!

--शुभा मोडक (२६-एप्रिल-१२)