Wednesday, May 2, 2012

संयम आणि मोह

एकच कविता २ वेगवेगळ्या प्रकारे सूचली होती. दोन्हीतला मूळ आशय सारखाच असला तरी शेवटाकडे एक सूक्ष्मसा फरक आहे. म्हणून शीर्षकेही वेगवेगळी दिली आहेत.

संयम की मोह?

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे, त्याचं काय करू?
आता बघायचं कोण जिंकतं?
संयम...... की मोह?


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संयम आणि मोह

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
आणि मग घेतली संयमाची झूल पांघरून
पण काही चुकार आठवणी बधतच नाहीत
येतातच इवल्याश्या फटीतूनही
सरकत बाहेर...
मोह होतोच मग त्यांना कवटाळण्याचा
घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)
मग मात्र देते जबरदस्तीने परत धाडून
फटीतूनच सावकाश...
पण तुझ्याच आठवणी त्या!
तुझ्याइतक्याच बदमाष!
फटीआडूनही मिश्किल डोळ्यांनी डोकावतच राहतात
मग मात्र पुन्हा घेते संयमाने पाठ फिरवून!
आता....
असाच चालू रहायचा हा खेळ निरंतर..
कधी संयमाची सरशी
तर कधी मोहाची जीत!
..
.
.
चालायचंच!

--शुभा मोडक (२६-एप्रिल-१२)

No comments:

Post a Comment