Tuesday, April 17, 2012

नको ते पाऊसगाणे........!

नाचर्‍या पावसाच्या
आठवणी माझ्या बोचर्‍या आहेत
सरी बरसल्या की "तो" आठवतो
त्या सयी टोचणार्‍या आहेत


नाचर्‍या सरी हातावर झेलल्या
ओंजळ भर घेऊन मिरवल्या
आता त्या वेदनांचे डंख मारतात
त्याच आहेत पाऊसडोहात जपल्या


अंगणात येऊन पाऊस झेलला
गारव्या ऐवजी दाह वाट्याला आला
आता खिडकीतूनच धारा पाहते
भावनांचा बहर गेला


आता नवीन गणित मांडणे नको
पुन्हा ती वेदना साहणे नको
मनाचा डोह ढवळतो
पुन्हा ते पाऊसगाणे नको


--शुभा मोडक (२४-जून-११)

No comments:

Post a Comment