Tuesday, April 17, 2012

वर्तुळानंतर...

आता मी वर्तुळाला छेदायचं ठरवलंय
गप्प बसून सहन करण्यापेक्षा बोलायचं ठरवलंय


फार फार तर काय होईल??? चाकोरी मोडेल
मोडू देत.....
वाईटात वाईट काय होईल??? मी एकटी पडेन
पडू देत....


मूर्खासारखं त्याच त्याच परिघावर फिरायचं
पुन्हा पुन्हा एकाच बिंदूपाशी येऊन थांबायचं
तेच वर्तुळ परत परत नव्याने गिरमिटायचं


आता बास.....


त्यापेक्षा सरळ रेषेत चाललेलं बरं
मनात आलं की रस्ता बदलता तरी येतो


नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवी दिशा
एका रेषेला एक फाटा
नव्या पंखांना नव्या वाटा


आणि...
अगदीच दमून कुठे थांबायचं म्हटलं तरी
निदान.....
परत त्याच बिंदूपाशी येऊन पोचण्याची अगतिकता तरी नाही!


--शुभा मोडक (०२-डिसेंबर-१०)

No comments:

Post a Comment