Wednesday, April 18, 2012

माझं चांदण्याचं गुपित

रात्री त्याच्या प्रेमाचं चांदणं
माझ्या अंगणात सांडलं
मी वेचायला आले नाही
म्हणून सकाळी माझ्याशी भांडलं

मी म्हटलं, "रुसू नकोस.
आज रात्री ये परत!
चोराला चांदण्याची भीती
कसं नाही तुला कळत?"

"काल यायला निघाले होते
पण घात केला पैंजणांनी
तूच एकटा थोडीच झुरलास
मी ही मेले लाखो मरणांनी"

म्हटलं, "आज एक काम कर.
अंगणाऐवजी खोलीत ये.
खिडकीला थोडी फट ठेवीन.
गुपचूप अंग चोरीत ये."

चांदणं मग आनंदाने वेडावलं
त्यानं हसून "हो" म्हटलंय
"आज पैंजण काढून ठेव"
अशी तंबी देऊन परत गेलंय

रात्री मी तुमच्या मैफिलीत नसेन
तर मला शोधू नका
माझं हे चांदण्याचं गुपित
बाहेर कुठे फोडू नका

शुभा मोडक (१४-फेब्रुवारी-१२)

No comments:

Post a Comment