Thursday, April 12, 2012

प्रतीक्षा

युगानुयुगे संपली
तुझीच वाट पाहिली
खुळी ही राधिका तुझी
पहा खुळीच राहिली

षड्ज भावनेतले
न मागता तू जे दिले
तुझ्या सुरांत नाहण्या
मनी जपून ठेविले

सावळ्या गगनातला
पयोद हा निनादतो
तुझेच रुप लेवुनी
तना-मनात सांडतो

तू एकदा फिरून ये
हे एव्हढेच मागणे
अन् पुनश्च वर्षु दे
अमोघ प्रीत-चांदणे


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

No comments:

Post a Comment