Monday, April 16, 2012

जयद्रथ-वध

९वीत शिकत असताना शाळेतील सौ. देशपांडे मॅडम (या आम्हांला मराठी भाषा विषय शिकवीत असत) यांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाने "ओंजळ" नावाचा हस्तलिखित काव्यसंग्रह बनविला होता. वर्गातील जवळपास प्रत्येकाने लेखन, संपादन, चित्रकला (अंतर्गत चित्रे), मुखपृष्ठ रेखाटन अशा काही ना काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

त्याच वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाला प्रवीण दवणे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांना आम्ही तो काव्यसंग्रह दाखवून त्यांची शाबासकी मिळविली होती. आमच्या या प्रयत्नांना अभिप्राय म्हणून त्यांनी उत्स्फुर्तपणे एक कविता तयार करून त्या काव्यसंग्रहाच्या पाठीमागच्या पानावर स्वहस्ताक्षरात लिहून दिली होती. नंतर बरेच दिवस तो काव्यसंग्रह वर्गातल्या प्रत्येकाच्या घरी आळीपाळीने फिरत होता. आता नक्की कुणाकडे आहे देव जाणे! त्यामध्ये मी आणि माझी एक वर्गमैत्रिण दीपा पडियार अशा आम्ही दोघींनी मिळून एक कविता लिहिली होती. एक आठवण म्हणून इथे नोंद करते आहे:

जयद्रथ-वध
करुनि अभिमन्युचा वध,
राक्षसापरी हासे तो जयद्रथ!

जेव्हा कळे वर्तमान अर्जुनास,
जयद्रथ वधाचा त्यास लागे ध्यास

उदयिक मारुनि ठार जयद्रथास,
करिन पूर्ण मी माझी आस

अथवा होऊनि समर्पित अग्नीस,
पितृछत्र देईन स्वर्गात अभिमन्युस!

ऐकुनि अर्जुनाचा हा अटळ प्रण,
भिऊनि जयद्रथ न गाठे समरांगण

शोधितसे जयद्रथास व्याकुळ होऊनि पार्थ,
करावयास अपुला प्रण सार्थ

दुसरे दिनी कृष्ण करी चमत्कार,
करी ऊभा सूर्याभोवती ढगांचा पहाड!

येई जयद्रथ बाहेर दिन ढळला वाटून,
तेथे पेटे चिता अर्जुनाची धडाडून

पहा तरी त्या ईश्वराची लीला अफाट,
येति सूर्यदेव फाडूनि मेघांचा आंतरपाट!

माधव म्हणे, तो पहा सूर्य अन तो जयद्रथ,
चितेवरचा अर्जुन घेई अचूक शब्दवेध!

घेई पार्थ सूड अपुल्या पुत्रवधाचा,
विसावे तो बाण घेऊनि छेद जयद्रथ कंठनाळाचा!


-कु. शुभा सकळकळे
कु. दीपा पडियार
९ "अ" (१९९६-९७)

No comments:

Post a Comment