Monday, April 16, 2012

तुझी आठवण

कधी तुझी आठवण
पहाटेच्या गुलाबी थंडीसारखी येते
माझ्या अवती-भवती वावरून
अंगावर गोड शिरशिरी आणते


कधी तुझी आठवण
सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी येते
त्या मऊ रेशमी स्पर्शातून
तुझ्या प्रेमाची ऊब जाणवते


कधी तुझी आठवण
मंद सुगंधासारखी येते
आपल्या गंधित अस्तित्वाने
आसमंत दरवळून टाकते


कधी तुझी आठवण
वार्‍याच्या झुळकेसारखी येते
आपल्या थंड शीतल स्पर्शाने
तप्त जीवाला शांत करते


कधी तुझी आठवण
पहिल्या पावसासारखी येते
तुझ्या सहवासाच्या जाणीवेने
मन चिंब भिजून जाते


अशी तुझी आठवण
दरवेळी नवा अनुभव देते
सांग ना एकदा मला
काय तुलाही कधी असे होत असते?


--शुभा सकळकळे (१९९९)

No comments:

Post a Comment