Tuesday, April 17, 2012

मनाचा कॅनव्हास

बांद्रा रेक्लमेशनला म्हणे पावसात बघण्यालायक नजारा असतो.
अफाट वारा
बेफाम पाऊस
उधाणलेला समुद्र!
आणि...........
आणि या चित्राशी एकरूप झालेले कितीतरी "तो" आणि "ती"!
एकाच छत्रीत....एकमेकांच्या मिठीत....
खट्याळ लाटांना अंगावर झेलत ओलेचिंब!
....
....
....
....
मग "मी" कुठे आहे?
"मी" ही आहे की तिथेच...
पण शरीरानं नाही.... मनानं!
कारण मुळात माझ्याच मनाच्या कॅनव्हासवरचं कल्पनाशक्तीच्या कुंचल्याने रंगवलेलं ते चित्र आहे.
पण मग "तू" कुठे आहेस? "तू" कसा दिसत नाहीस या चित्रात??
कारण....
"तू" नाहीसच या चित्रात!
....
....
....
....
आधी "तू" इथं असायचास!
अर्थात पुन्हा मनानेच हं!
पण तुझ्या नाही, माझ्याच मनाने....
तेव्हा खूप सारे संग असायचे सोबतीला
रंगीत छत्र्या, रंगीत कपडे
काळे ढग, करडा पाऊस
निळा समुद्र, निळ्या लाटा
सप्तरंगी इंद्रधनुष्य!
....
....
....
....
आता त्या रंगांचीच भीती वाटते
असं वाटतं अंगावर येतील सगळे रंग धावून!
म्हणून मग आता काळ्या-करड्या रंगातच रंगवते मी चित्रं.
सारे "तो" आणि "ती" यांचे कपडेही करडेच, छत्र्याही काळ्या, समुद्रही काळाच!
ढग तर काळे असतातच.
मग त्यांतून पडणारा पाऊसही काळाच!
आता या चित्राला तरी दृष्ट नको लागू दे...
म्हणून मग चित्राच्या खाली उजव्या कोपर्‍याला एक काळी तीटही लावते!
"तू" नकोच येऊस या अशा चित्रात.
तसं पण रंगविहिन आसमंतात तुला बघायची सवयच नाही या डोळ्यांना...........

--शुभा मोडक (२३-ऑगस्ट-११)

No comments:

Post a Comment