Wednesday, April 18, 2012

जिगसॉ पझल

निवांत वेळ असला की
आयुष्याचं जिगसॉ पझल मी जुळवायला घेते
एक तुकडा सोडून बाकी सगळं चित्र जुळतं
मी ही तो तुकडा शोधण्याच्या भानगडीत पडत नाही
कारण मला माहितीये की तो तुकडा माझ्याजवळ नाहीच मुळी!
तो तर तू घेऊन गेलास तुझ्या सोबत!
नव्हे, मीच तुला तो घेऊन जाऊ दिला
त्या तुकड्याशिवाय माझं चित्र अपूर्ण आहे, ठाऊकाय मला..
पण हे चित्र असंच हवं असतं मला...
ती अपूर्णतेची जाणीव हे तुला आठवण्याचं निमित्त असतं!
अशा वेळी आशा मनात गुणगुणून जाते
"स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा!"
माझ्या स्वप्नातल्या, त्या उमलण्यापूर्वीच खुडलेल्या कळ्या
त्या तुकड्यासोबत तुझ्याजवळ जपून ठेव!
न उमलताही माझ्या आठवणींचा गंध त्या तुला देत राहतील
थोडं माझं "मी" पण ही जडवलं होतं मी त्या तुकड्याला..
ते ही जपून ठेव!
परत जेव्हा स्वतःला हरवून बसेन तेव्हा हक्काने साद घालेन तुला...
बघ... जमलं तर ये!
तेव्हढंच माझं जिगसॉ पझल पूर्ण झाल्याचं समाधान...
थोड्या क्षणांकरता का होईना.....!


शुभा मोडक (१५-फेब्रुवारी-१२)

No comments:

Post a Comment