ओलेती दरवळ
काल बघ ना.. कसा अवेळी पाऊस पडला!
त्याच्या नि तुझ्या समान सवयींपैकी ही पण एक!
ध्यानी मनी नसताना
कसला आगा-पीछा नसताना, अवचित अवतरायचं
बेहोष धुंदी चढून उतरायच्या आतच
तितक्यात नकळत चटकन विरून जायचं..
तुझं हे क्षणभराचं अस्तित्व मिटतं आपोआप!
पण त्या ओलेत्या सुगंधाची दरवळ....
तिचं काय करू?
तुझ्या अस्तित्वाची जाणीव तिच्या रुपाने उरतेच मागे!
...
...
...
पुढच्या वेळी येताना एक काम करशील?
एक तर या जीवघेण्या कळा सोबत आणू नकोस
किंवा मग...
..
..
किंवा मग येऊच नकोस!!
--शुभा मोडक
१२-ऑक्टोबर-१५