Sunday, April 29, 2012

तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्या प्रेमाचं आभाळ
दिलं तुला मी आंदण
बदल्यात चंद्रस्पर्श
अंगांगावरी गोंदण

तुझे अवचित येणे
असे माझ्या आयुष्यात
जशी काळोख्या रात्रीला
लाभे चांदणपहाट

उधाणल्या ह्या मनाला
मग भरतीची लाट
तुझ्या ओलेत्या खुणांनी
गच्च माझी पायवाट

मनाच्या ओल्या रेतीत
सयींचे शंख-शिंपले
रंगीबेरंगी क्षणांना
तयांत मी गुंफियले

सांग फेडायचे कसे
देणे नक्षत्रांचे तुझे
तुझ्या प्रेमाच्या तोडीचे
फक्त हृदयच माझे

तेच अर्पिते मी तुला
देण्या अन्य नसे काही
बाकी काहीही देऊन
ऋण फिटणार नाही

गोड प्रेमाचा वर्षाव
नित्य असा बरसू दे
माझ्या चांदण्याचा गाव
तुझ्या डोळ्यांत वसू दे


--शुभा मोडक (२७-एप्रिल-१२)

Wednesday, April 25, 2012

त्रिवेणी - १

आकाशात आणि मनात
एकाच वेळी मळभ कसं दाटून येतं?
आकाशालाही कुणाची तरी आठवण छळते वाटतं!

------------------------------------------------

रोज तर तुझ्याशी बोलणं होतं
फक्त अमावस्या सोडून....
वेडा चंद्रच त्या रात्री उगवत नाही!

------------------------------------------------

स्वतःची तारीफ स्वतःच करते आता
पण आरशासमोर यायचं टाळते
मेला आरसा खोटं का बोलत नाही?

------------------------------------------------

जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!

------------------------------------------------


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

Thursday, April 19, 2012

तुझं नसणं.... की असणं??

वीणेचे ध्वनी विरले तरी
कंपनं मागे रेंगाळावी
अस्तित्वाच्या खुणा मिटल्या तरी
चाहुल मागे सळसळावी
तसं तुझं भरून राहणं!


समुद्राच्या लाटा लोपल्या तरी
गाज मागे रहावी
पाव्याची धुन थांबली तरी
रुंजी मनात उरावी
तसं तुझं उरून राहणं!


चंदन झिजून संपलं तरी
गंध मागे दरवळावा
मैफिलीतलं गाणं सपलं तरी
सूर मागे रेंगाळावा
तसं तुझं पुरून राहणं!


--शुभा मोडक (११-एप्रिल-१२)

Wednesday, April 18, 2012

शिकस्त

तू दिलेलं सगळंच
मनापासून स्वीकारलेलं..
प्राणप्रिय असल्यागत जपलेलं..
मग तू दिलेली जखम तरी
टाकाऊ कशी असेल?
ठेवलीय जपून ती ही अलवारपणे....
ती कधीच भरून येऊ नये म्हणून काळजी घेते आता
पण ती भळभळूही नये ह्यासाठी
प्रयत्नांची किती शिकस्त करावी लागते माहितीये?

--शुभा मोडक (१३-मार्च-१२)

बोलका ओलावा

तुझ्या माझ्या ओल्या आठवणी
मनाच्या तळाशी रुजल्या आहेत
कधी कधी आसवांवाटे बाहेर येतात
इतक्या त्या माझ्यात भिनल्या आहेत

आठवांचं वादळ दाटतं
जेव्हा मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसतो
नयनांच्या पागोळ्यांत

मी अबोल राहिले तरी
हा ओलावाच बोलका होतो
दाटून आलेल्या वादळाचा
मग ढगही हलका होतो

--शुभा मोडक (०७-मार्च-१२)

अबोल वेदना

एक भकासपणा
उगीचच वेढून राहिलेला
एक उदासपणा
उगीचच खेटून राहिलेला

समोर वाट दिसते
म्हणून चालत रहायचं
समईत तेल शिल्लक आहे
म्हणून जळत रहायचं

मनाचा स्वतःशीच संघर्ष
मनाची स्वतःशीच ओढाताण
मनाचीच मनावर फुंकर
मनाचेच मनाला बाण

जखम अशी की
झाकताही येऊ नये
वेदना ठुसठुसली तरी
सांगताही येऊ नये

सर्वांमध्ये मिसळूनही
मी अलग, अलिप्त
एक भावना मनाच्या तळाशी
दडून निद्रिस्त, सुप्त


--शुभा मोडक (२७-फेब्रुवारी-१२)

जिवलग वालं प्रेम

तू न बोलून शहाण्यांच्या पंक्तीत बसणारा
आणि मी बोलून वेड्यांचा किताब मिळवणारी
तुझ्या गाळलेल्या जागा मी भरून घ्यायच्या
"आहे ना?" तुझा दोन शब्दी प्रश्न
ह्या प्रश्नातला "प्रेम" हा अध्यारुत शब्द मी समजून घ्यायचा
"आहे ना! एकदम जिवलग वालं प्रेम आहे!" माझं उत्तर
आणि सोबत माझं एक खळाळतं हास्य..
हा प्रश्नोत्तराचा आपला ठरलेला खेळ! नेहमीचाच !..
हा "जिवलग" शब्द मात्र तुझाच! खास!
पहिल्यांदा ऐकल्यानंतर मला न आवरता आलेलं हसू..
"जिवलग वालं प्रेम??? ते काय असतं??" माझा खोडकर प्रश्न..
आणि उत्तरादाखल तुझी अबोली शांतता
.
.
.
एक सांगू का?
तू न बोलताही मला समजतं तुझ्या मनातलं..
ह्या जीवाचं त्या जीवालाच कळेल असं जे काही ते म्हणजे "जिवलग"!
हो ना?
.
.
.
म्हणून तर..
तुझ्या शांततेचा आवाज पोचतो माझ्यापर्यंत
त्या शांततेला मग मी घालते माझ्या शब्दांचं कोंदण
ते जिवलग वालं प्रेम त्या कोंदणाच्या आत घट्ट धरून ठेवायची
ही माझी वेडी धडपड समज हवं तर.....!

शुभा मोडक (१६-फेब्रुवारी-१२)